Friday, 9 August 2013

पाऊस, मी आणि आठवणी...


                                पाऊस, मी आणि आठवणी... 

          रखरखत्या उन्हाळ्यात जर थोडंस  आभाळ आलं  तर जीवाला किती हायसं  वाटतं  ना !! दुपारच्या कडक उन्हात आंब्याच्या झाडाखाली जो विसावा मिळतो,अशा त्या विश्रांती  समोर स्वर्गाच्या आरामदायी सुखाची कल्पनाही टीचभरच! अशा वेळी मग त्या झाडाखाली पंख्याची सोय नसली तरीही तिथं बसल्यावर घामाचा त्रास होऊ नये याची काळजी तो वारा घेत असतो. बाहेर कानाला असह्य होणाऱ्या  उन्हाच्या झळा, तिथं असल्याचाही भास होत नाही. बाहेर उन्हाचं  अविरत साम्राज्य! डोळ्यांसमोर दिसणारी फ़क़्त दाहक-अतिदाहक उष्णता! पण झाडाच्या सावलीत?? झाडाच्या सावलीत मात्र पाण्याची शीतलता!  ज्याने तहानभूक विसरावी असा विसावा! ज्याने नकळत डोळे मिटावे असा गोड गारवा!!
          असो, उन्हाच्या या भल्या मोठ्या साम्राज्याला आव्हान देण्यास ती सावलीदेखील पुरेशी आहे. पण असंख्य जलधारांचा वर्षाव करणाऱ्या पावसाच्या काळ्याभोर मेघांना आव्हान देण्याचे सामर्थ्य कुणात? असा प्रश्न उद्भवने गैर नव्हे! शालेय शिक्षणात मी दरवर्षी असाच पावसावर निबंध लिहित आलोय. तशी दरवर्षीच माझी अन पावसाची मैत्री देखील वाढत आलीय.
          या पावसाळ्याबद्दल कुणी कशाही विचारांचा असो, मी मात्र यासाठी नेहमीच उत्सुक असतो. पाऊस! ज्याच्या येण्याची कल्पना विजांच्या चमकण्यातून येते, ज्याचे सामर्थ्य ढगांचा गडगडाट सांगतो,असा हा पाऊस म्हणजे सम्राटच!! पावसाबद्दल एका पुस्तकात वाचेलेले वर्णन आठवते की-"नवऱ्याने मारले,राजाने हाकलले आणि पावसाने झोडपले तर कुणाकडे फिर्याद दयायची?'' परंतु जसं वर्णन केलं जातंय तसा तो काही हुकूमशहा (क्रूर शासक) किंवा भूकंप,ज्वालामुखी सारखा प्रकोप  नव्हे!
                      " तो तर चराचर सृष्टीचा कणा आहे 
                        त्याच्याशिवाय इथं जीवनास मना आहे,
                        सजीव सदाच चेहरे बदलत गेले -
                        पण हा पाऊस मात्र जुना आहे." 

     

      स्वर्ग पाहण्यास मिळावा अशी कुणाची इच्छा नसते? पण त्या स्वर्गासाठीही पुण्याईच्या शिदोरीची सोबत असावी लागते, याउलट पृथ्वीवरील स्वर्गाची प्रचीती देणारा हा पाऊस म्हणजे निसर्गातील अनमोल वरदानच! जीवनाला कंटाळल्लेल्या व मृत्यूची इच्छा झालेल्या एखाद्या व्यक्तीचे मन वळविण्यास या पावसाचे काही थेंबच पुरेसे असतात. अशा या प्रभावी पावसाच्या आगमनाच्या वेळी घडणारा प्रत्येक बदलाव हा सुखदायक असतो.
          पावसाआधी आकाशात ढग गोळा झाले की,डोळ्यांवरील ताण कमी होऊन पापणी पूर्ण उघडते. पक्षांची किलबिल घराची आठवण करून देत असते. हवा थोडीशी कुंद होते,पाय वळण घेतात,पण मग मन वळत नाही. मन कश्याच्यातरी शोधात गुंतून जाते. श्वासांमधील बदल लगेच जाणवतो. तहानलेली माती,सारे भूचर,जलचर आणी वनचर प्राणी आता पावसाच्या प्रतीक्षेत असतात. आणि  तो क्षण येताच श्वास फुलतो तो एका दैवी आविष्काराने- मृद्गंध ज्याचं नाव!!
         "मृद्गंध"- निसर्गातील लाखो करोड जीवना पुन्हा पुन्हा लाभावा असा सुगंध. सर्वदूर पसरत सृष्टीतील  साऱ्या  सुगंधित फुलांच्या सत्तेवर वाजवी वर्चस्व करणारा हा मृद्गंध जणू काही दूरवरच्या स्वर्गाचे प्रतिनिधित्व करतोय असे भासते! मृद्गंधानंतर सुरु होतो विजांचा झगमगाट त्यानंतर ढगांचा गडगडात अन पावसाची सुरुवात. पावसाचे टपोर थेंब,सरींवर सरी-असंख्य सरी, आणि  आता फक्त पाऊस-धो-धो कोसळणारा पाऊस!!
          अशा या पावसामध्ये कधी कधी शहराबाहेरील उंच टेकडीवरून या मायावी शहरांकडे बघताना मात्र मनात विचार येतो  की- का जगतात अशी माणसे ज्यांची कातडी तर जाड आहे पण त्यात चार थेंब झेलायचं सामर्थ्य नाही! का जगतात अशी माणसे जे ताटकळत बसतात तासनतास वाट पाहत पाऊस थांबायची! बाहेरच्या पावसाचा आवाजही ज्यांना आवडत नाही आणि घरात फक्त टीव्हीसमोर ज्याचं सर्व जग असतं,त्यांचे जीवनाबद्दलचे विचार काय आहेत हे त्यांनाच माहीत!! या लोकांनी  कवी मंगेश पाडगावकरांचे "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे " हे गीत वारंवार ऐकावे असे मला वाटते. त्याच गीतातील 'चंचल वारा या जलधारा,भिजली काळी माती' या ओळी वाचून मनातल्या विचारांना जे वळण लागते त्यावर पाऊल ठेऊन बघावे.. मी त्यांना सांगेन  कि विशेषतः शहरातल्या धावपळीतून थोडा वेळ काढून जरा आपल्या भोवती बघा. . .  मित्रमंडळी,टीव्ही,घर,नातेवाईक याव्यतिरिक्त देखील आपल्यासाठी बरेच मित्र आहेत,जे नेहमीच काहीतरी भेट घेऊन येतात आपल्याला भेटायला. . 
               " बघायचंय  त्या मित्रांना -
                       तर आभाळाकड  बघा सताड डोळ्यांनी,
                      बघा पावसातील सरी  बरसणाऱ्या,
                     बघा नदीकडे अवखळ वाहणाऱ्या ,
              आणि  बघा कधी सूर्याकडे-उगवणाऱ्या अन  मावळणाऱ्या,
                   बघा... " रात्रीच्या पावसात उंच उंच इमारतींकडे
                                      कसा रंगतो त्यांचा होळीचा खेळ,
                   रात्रीच्या पावसात बघा ... दूर जाणाऱ्या  रस्त्याकडे 
                                     जो लुटतो पावसाचा आनंद अखंड पूर्ण वेळ." 
             
          एक विचार केला तर शहरात हजारो माणसे शेकडो विचारांची तसेच कधी कुणी काय करावे हा ज्याच्या त्याच्या मर्जीचाच प्रश्न..  तेव्हा त्यांच्या पसंतीमध्ये हस्तक्षेप करू पाहणाऱ्या मला, कुणी माझ्या पसंतीत हस्तक्षेप घेतला तर मला तरी चालेल का?

          असो या पावसाने मला आजवर बरेच काही दिलंय! मी फार लहान होतो तेव्हा पावसामध्ये वाहत्या पाण्यात कागदाची होडी सोडतांना जे चार थेंब पाठीवर पडायचे त्यातच भिजल्याचा आनंद मिळायचा शिवाय जिंकल्याचाही!! आज मात्र मोठा झालो तसे मग फक़्त ओठांवर गाणी-"वो कागज कि कश्ती,वो बारीश का पानी ". . . . 
माझ्या मते तरी, 
          "आजही राहवत नसेल कधी तर-मनसोक्त भिजावं पावसात,
                      अन जगावं अस्सल जगणं- पावसाळ्यातील दिवसात."


           आजही मी चिंब भिजून घरी आलो आणि ग्यालरित  उभा राहून चहा घेत होतो तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस चालूच होता. समोरच्या घरातील तीन वर्षाचं मुल खिडकीतून बाहेरचा पाऊस बघत होतं. खिडकीबाहेर हात काढून पावसाचे थेंब पकडायचा प्रयत्न बहुदा ते करत असावं. मग तसा पाऊसही मुद्दाम थोडा तिरपा होऊन त्या चिमुकल्या हातांवर बरसात होता. या चिमुकल्याचं अन पावसाचं नातं काय? कशामुळे त्याचा चेहरा खुललाय? याचाच विचार करत मी पावसाकडे कितीतरी वेळ शुन्य दृष्टीने बघत होतो. काही वेळानंतर पाऊस मंदावला होता. रीमझीम रीमझीम करत रेंगाळणारा पाऊस जणू स्वतःचाच पराक्रम छाती फुगवून पाहत होता. वारा  मात्र पावसाला सोबत घेऊन अजूनही लोकांना छ्ळत होता. 
          बऱ्याच वेळानंतर मग हा पाऊस थांबतो आणि तेव्हा सजलेली वसुंधरा पाहून सूर्यदेवही तिला सप्तरंगी इंद्रधनुष्याचा गजरा लावतात! सबंध सृष्टी हर्षोल्हासीत भासू लागते. वृक्षवेली, पाने, फुले, डोंगरदऱ्या, वस्त्या, आणि सारे सजीव नवीन वाटू लागतात. सर्वांच्या ठायी मात्र एक समानता,ती म्हणजे- सार्थकता !! समाधान ! तृप्ती!! आणि अशाच पावसानंतर अनुभवायला मिळतो तो गारवा!!!
          "गारवा"- ज्याच्या केवळ स्पर्शानं अंग अंग रोमांचाने फुलून येते अन ज्याच्या सहवासात श्वास खोल होऊन डोळे उगीच ओलावतात! भारावलेल्या मनःस्थितीत सारी सृष्टी डोळ्यांत तरळू लागते अन उभ्या जागी डोळे नकळत मिटले जातात तो- पावसामधील गारवा! वाऱ्यांच्या सरींनी मनाला बेधुंद करतो तो गारवा अन ज्याच्या प्रत्येक स्पर्शातून सार्थकतेचा प्रत्यय येतो असा तो "पावसानंतरचा गारवा"!!

                             "गगनातही तो गारवा ,
                               तो वाऱ्यामध्येही गारवा ,
                              पाण्यातही तो गारवा ,
                               तो गाण्यामध्येही गारवा"!!!

          वरती मोकळे आकाश आणि इथे स्पर्शणारा मोहक गारवा,अशा वेळी मग मन भटकतं ते दूरवरच्या दऱ्या-खोऱ्यांत! तिथला तो तलाव नेहमीच आजारी भासणारा; पण तोही आता त्याचे वाढलेले सामर्थ्य दूरवर पसरून दाखवीत असेल! स्वतःच्या पसरलेल्या हातांकरवी साऱ्या पक्षांना आपल्याकडे बोलावीत असेल! तिथला तो काळा पर्वतदेखील आता आळस सोडून वाऱ्यासवे आपले अंग झटकून देत असेल! आणि त्यासरशी शेकडो पक्षी आसमंतात झेप घेतील!! इंद्रधनुच्या सप्तरंगा भोवती घिरट्या घालत आपल्या नानाविध आवाजांनी त्यांनी तिथले आकाश दणाणून सोडले असेल!!!

                              " निनाद आसमंती 
                                            या मुक्त पाखरांचा 
                                निःशब्द जीवनांस 
                                            सहवास या सुरांचा "

असे ते विहंगम दृश्य अन संगीतातील अलौकिक आवाज ऐकून कोण या सजीवांना मुके म्हणणार?
          अशा या रोमांचक वातावरणात डोळ्यांसमोर अनेक चित्र उभी राहिली. मागील आठवडयात गेलो होतो तिथली ती नदीसुद्धा आज थोडी अवखळ वाहत असेल असं वाटू लागलं! समुद्राला भेटण्याची तिची आजची तळमळ प्रवाहाच्या वाढत्या वेगातून स्पष्ट दिसून येईल!! तसा तिकडे तो सागरही मग उंच उंच जाऊन नदीच्या प्रवाहाची आतुरतेने वाट बघत असेल !! सागर- मग तो कितीही खोल असला तरीहि या गारव्याच्या धुंदीत उमगणाऱ्या आकर्षणाला आणि नवचैतन्याला तो तरी कसा अपवाद असणार? अशी तर मनाला वेडावणारी धुंद असते या गारव्यात!!!!
          पण, पण हीच वेळ जर रात्रीची असेल तर? तर हाच गारवा काट्यासारखा बोचतो! आठवणींचा ससेमिरा उगीच मागे लागतो. वर्ष-वर्ष मागे जाऊन स्मृतींमधील अनेकविध प्रसंग डोळ्यांसमोर येतात. अशा वेळी मन मात्र काही गुलाबी क्षणच आठवायचा प्रयत्न करीत असतं…  पण- आडात नाही ते पोहऱ्यात कुठुन येणार? मग पुन्हा वाटतं की उद्या निदान आठवणी येण्यासाठी तरी आज कुणी असावं… 
         
      आठवण! एक गोड आठवण!
          केवळ एक गोड आठवण दुःखाची  शेकडो पर्वतं पार करण्याचे सामर्थ्य देते. आता मी एक फार्मसीचा विध्यार्थी आहे म्हणून नव्हे पण मला हे अगदी खरे वाटते कि आठवणी ह्या औषधासारख्या असतात-की ज्या कधी अमृतापेक्षाही गुणकारक तर कधी विषापेक्षाही घातक ठरतात!!  आठवणी म्हणजे आयुष्यातील कटू-गोड प्रसंगांचे दर्शन घडविण्याचे सामर्थ्य असलेले आणि केवळ मनुष्य जातीस मिळालेले एक अद्भुत वरदान!! माझ्या मते-
  
               "आठवणींत असावेत - दोन गोंधळलेले चेहरे
                                                         अन त्यांचे डोळ्यांमधले भाव,
                                                  काही अप्रिय क्षणांचे 
                                                          मनावरील घाव…


                  आठवणी असाव्यात- काही अविस्मरणीय दिवसांच्या 
                                             ठराविक वेळेच्या, ठराविक ठिकाणांच्या…  

             
                  आठवणी, मग त्या गुलाबी नसतील तरी चालेल,पण 
                                                  आठवणींत असावे थोडे हसु
                                                                     कुणाचे तरी ओठांत 
                                                  आठवणींत असावे थोडे अश्रु 
                                                                     कुणाचे तरी डोळ्यांत …। "


          कारण, या आठवणींवरच तर सारे जगतात. शिवाय हे सर्वश्रुत आहेच कि  "आठवणींमुळे डोळ्यांच्या कडा ओलावतांना फार कमी वेळा आनंद होत असतो." शेवटी त्यालाही नशीब असावं लागतं !!
          आता मात्र यापुढं , 

               " येणाऱ्या पावसात - गुलाबी आठवणी साचावायच्या , 
                  अन गारवा तो कसा असतो- तो एकदातरी अनुभवायचा…"

          आणि गुलाबी आठवणी लवकर नसतीलच भेटणार तर- 
                    तर मग दरवर्षीच भेटू - " पाऊस आणि मी "

                                                                                                                                                                               -साज 
                                                        दिनेश दिगंबरराव ताठे 
                                                              *AMBITION*
                                                                                  

                                        


      

2 comments:

  1. खूपच सुंदर आठवणीतील पाउस आहे

    ReplyDelete