Wednesday 18 September 2013

विचारवंताना समजावून घेतांना

आता दिल्लीमध्ये येऊन मला वर्ष होत आहे. त्यामुळे दिल्ली कशी आहे? तुला करमतं का रे तिथं? असे प्रश्न विचारणे आता बंद झालेत. पण संपतात त्यांना प्रश्न म्हणत नाहीत, किमान घरच्यांचे किंवा जवळच्या मित्रांचे प्रश्न तर मुळीच नाही!! तेव्हा आता त्यांनी नवीन प्रश्नमालिका सुरु केलीय- तुला दिल्ली सोडावी वाटत नाहीये ना? तुला घराची आठवणच येत नाही वाटतं? तुला दिल्लीतच सेटल व्हावं वाटतंय का? इ.. 
      खरं तर बऱ्याचदा काही  प्रश्नांना उत्तरे दयायची इच्छा नसतानाही किंवा उत्तरे माहित नसतानाही आपल्याला त्यांना सामोरे जावं लागतं!! तेव्हा अशा प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी हल्ली सातत्त्याने जे वाक्य वापरतो त्यासाठी मी श्री नंदन निलेकनी यांचे भरपूर आभार मानतो. त्यांनी आपल्या 'Imagining Indiaया पुस्तकात एका ठिकाणी लिहीले आहे कि- "Decisions are always easy when you have no option left with you." 
      मला या काही मोठ्या माणसांच्याबद्दल आदर असण्याचे हेही एक कारण आहे कि ह्या लोकांनी जगाला दिलेली काही वाक्ये खरंचच कुणालाही अन कुठेही कायम कामा येतील इतकी ती वैश्वीक असतात. विषेशतः या वाक्यांचा वापर परीक्षेमध्ये निबंधात लिहितांना किंवा स्पर्धेत अथवा चर्चेत बोलताना केला कि,आपण सर्वसामान्यांतून वर आल्यासारखे वाटावे इतके सामर्थ्य या वाक्यांमध्ये असते! मला आठवते कि शाळेत निबंधाची तयारी करताना आम्ही अशी काही वाक्ये वेगळी लिहून ठेवली होती. ती वाक्ये अजूनही मी वापरतो, ती फ़क़्त कुठे लिहिण्या-बोलण्यासाठी नव्हे तर बऱ्याचदा नवीन गोष्टी समजून घेण्यासाठीदेखील! 
      यातली सर्वच वाक्ये अतिशय सुंदर संदेश देत असतात. काही वाक्ये इतकी समर्पक असतात कि त्यांचे प्रभावक्षेत्रही विश्वव्यापक असते. परंतु यातली काही वाक्ये समजणे हे म्हणावे तेवढे सोपे नसते-हे आत्ताशी माझ्या लक्षात येऊ लागले आहे! पंडित नेहरूंनी त्यांच्या 'The discovery of India' या नावाजलेल्या पुस्तकात लिहिले आहे कि- "Moral approach is conditioned by mental climate of the age ."  नेहमीप्रमाणे हेही वाक्य मला आवडले. याचा मतितार्थ (तूर्तास जेवढा माझ्या लक्षात आला आहे तेवढा) असा कि बऱ्याच  गोष्टींचे आकलन तसेच निर्णय हे माणसाच्या वयावर (अर्थात वयानुसार प्राप्त झालेल्या अनुभवावर अन समजुतीवर) अवलंबून असते.


 
            शाळेत शिकत असताना आम्हाला सातवी-आठवीमध्ये 'मित्र' नावाचा श्री ना. सी. फडके यांचा धडा होता. त्यातले एक वाक्य मला फार आवडायचे "मैत्री म्हणजे फ़क़्त सहवासाच्या झाडावर हमखास उमलणारे फुल नव्हे." असेच काहीसे ते वाक्य सहवास नि मैत्री या नात्यावर प्रकाश टाकणारे होते. नंतर पुढे बारावीमध्ये असताना माझ्या एका आर्ट्स च्या मित्राकडून मी मराठीचे पाठ्यपुस्तक वाचण्यासाठी मागितले होते. त्यातही तोच 'मित्र ' नावाचा लघुनिबंध दिलेला होता. हे खंर आहे कि वाढत्या वयाबरोबर माणसाची आकलनक्षमताही वाढत असते अगदी तसेच वाढत्या वाचनासोबातही !! आज पुन्हा तोच 'मित्र' हा लघुनिम्बंध वाचताना काही नवीन पैलू लक्षात येतात. 'जोनाथन' या पक्षाची श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितलेली कथा पुन्हा-पुन्हा ऐकतांना दरवेळी नवीन बाबी लक्षात येत राहतात. अगदी तसेच या महापुरुषांच्या वाक्यांच्या बाबतीतही असते. महात्मा गांधी, सावरकर, भगतसिंग, डॉ आंबेडकर इ. . ना समजून घेतानाही आता नवीन गोष्टी लक्षात येताहेत. वाचनामुळे बरीच पुर्वग्रहे दूर होताहेत. 
         मला आठवते कि- शाळेत मराठीच्या पुस्तकात केव्हातरी आम्हाला श्री. जनार्दन वाघमारे यांचा 'महापुरुषांचा पराभव' नावाचा एक धडा/लघुनिबंध होता. त्यातले एक वाक्य असे होते- "थोर महापुरुषांच्या विचारांनादेखील  काळाच्या मर्यादा असतात." त्यानुसार इथे आपण  वर्तमानात जगतांना भूतकाळातील महान विचारांना जसेच्या तसे लागू करता येत नाही असे समजू शकतो. पण बऱ्याचदा अनेक विचारवंताना समजावून घेतांना तत्कालीन संदर्भ लक्षात घेणे गरजेजे असते. संदर्भ लक्षात न घेता एकतर आपण त्या वाक्यांचे महत्व/तीव्रता तरी कमी करतो अथवा वेगळाच असा अर्थ तरी त्यातून निर्माण करतो. आंबेडकरांचे 'one state one language', गांधीजींचे 'केवळ अहिंसा हाच एकमेव मार्ग ' अशी काही वाक्ये या प्रकारात मोडतात. बऱ्याचदा समरूप परिस्थितीच काही वाक्यांची तीव्रता/महत्व  समजून येत असते. कसे विदेशात दूर असणाऱ्या व्यक्तीलाच सावरकरांचे ''ने मजसी ने परत मातृभूमीला '' हे व्यापक दृष्टीने समजत असेल. 
      सध्या मी मार्क्स, हेगेल, लेनिन,जॉन लेक, मकेवेलि, कौटिल्य, नेहरु, आंबेडकर, इ. विचारवंतांची राज्यशास्त्रसंबंधातील विचार वाचतोय. ते वाचतांना मनाला उमलण्याचा आनंद होत असल्याचे भासतेय. कदाचित याच विचारवंताना मी वयाची साठी उलटल्यानंतर वाचतांना नवीन बाबींचा साक्षात्कार होऊ शकेल, किंवा कदाचित यांवर मत करून तोपर्यंत काही नवीन विचारवंत उभे राहतील!! तूर्तास तरी मला हे वाचण्यात मजा येत आहे. मनाची/बुद्धीची नवी दारे उघडत आहेत. पूर्वी घराची आठवण येत नाही का? या प्रश्नांवर मी हो/नाही किंवा येत असली तरी काय करणार? अशी उत्तरे द्यायचो. आता मात्र त्याच प्रश्नांवर उत्तराचा विचार करताना माझे मन नेतृत्वं करू लागतं- त्या सर्व व्यक्तींचं - ज्यांना वर्षोनवर्षे दूर राहावे लागते घरापासून-तेही लढण्यासाठी; ज्यांना राहावे लागते दूर आपल्या घराच्या पोटासाठी, आणि ज्यांना स्वतःचे असे घरंच नाही-जन्मल्यापासून त्याचं....   बऱ्याचदा अशा वेळी पसायदानाच्या काही ओळी ओठांवर येत राहतात. अतिशय व्यापक अशा अर्थाचे हे पसायदान मी कितपत समजू शकलोय माहित नाही पण त्यामुळे माझ्या मनाला धीर मात्र मिळतो.
      असो. मोबाइलवर मी नुकताच एक नवीन वालपेपर लागु केला आहे. कधीकाळी माझ्या मनात एका फार मोठ्या नायकाचे म्हणून स्थान असणाऱ्या हिटलरचे हे वाक्य आहे-
                  "If you don't like the rule - just follow it...
                   Reach the top- and change the Rule."
 सध्यातरी माझ्या दिल्लीतील inevitable मुक्कामासाठी मला हे वाक्य प्रेरणा देत आहे. बाकी शक्य होईल तेव्हा लवकरच घरी जाईल एवढेच..!


                                        *AMBITION*